पिंपरी : पिपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी तब्बल ५६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पिपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने २२ ऑगस्ट ला औरंगाबाद, जालना आणि बीड येथून पाच जणांना अटक केली.
ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय २९, रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल (वय २३, रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (वय २६, रा. बीड) अर्जुन विष्णू देवकाते (वय २८, रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय २२, रा. बीड) यांना २२ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७६ मोबाईल फोन, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, २२ वॉकीटॉकी संच, ११ वॉकीटॉकी चार्जर, ११ लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. याचबरोबर हे डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ७२० जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली. ही प्रक्रिया जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होती. भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार कडून केला जात आहे. या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली अहिती. तपासात पोलिसांनी पूर्वी ५१ आरोपींना अटक केली. त्यातील २६ जण हे भरतीमध्ये उमेदवार होते. तसेच आणखी ७५ पेक्षा अधिकजण या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या ७५ आरोपींमधील १२ आरोपी भरती प्रक्रियेत एवढा घोटाळा करूनही नापास झालेले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्या या कारवाईत पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा विविध शहरांमधून २० पेक्षा अधिक कारवाई करून ५६ आरोपींना पिंपरी -चिंचवड पोलिसांनी अटक केली.