पुणे : दहशतवाद्यांबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी कोथरूड परिसरातून अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचल्याचे उघडकीला आले होते. याच दहशतवाद्यांनी घरात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही समोर आले होते. आता ‘एनआयए’ने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संशयित असलेल्या आरोपींची मालमत्ता ‘एनआयए’कडून जप्त करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्याठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता, त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती.
दरम्यान, ‘एनआयए’ने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरातील एकूण ४ मालमत्ता कडून जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट देखील ‘एनआयए’कडून जप्त केला आहे. ‘एनआयए’कडून या प्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरम्यान, सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे ‘एनआयए’च्या तपासात समोर आले आहे. मालमत्ता जप्त केली गेली म्हणजे ‘एनआयए’ला आणखी काही मोठी माहिती मिळाली का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.