पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. येथे या रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे रंगेहाथ पकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमंक प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एसीबीनं मोठी कारवाई केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ पकडलं आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फर्निचर पुरवठादाराकडे अधीक्षक बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक चौधरी यांनी 1 लाखांची लाच मागितली होती. याची माहिती लाचलुचपत विभागाला कळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोन्ही अधिकाऱ्याऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचर पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही माफिया ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण आणि पुण्यात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा प्रकार येथेच घडला होता. यानंतर आता या रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत आले आहे.