पुणे : पुण्याच्या कोथरूडमधील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गळा दाबून एका 55 वर्षीय उद्योगपतीची हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण साधू शिंदे असे हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव आहे. याप्रकरणी शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा आणि पुण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांना कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून घेतले. त्यानंतर शिंदे यांची हत्या करण्यात आली आहे. कंपनीला आवश्यक असणारे काही साधनं आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो अश्या आशयाचा मेल आरोपींकडून उद्योगपतीला आला होता. त्यानंतर उद्योगपती शिंदे बिहारला गेले होते. शिंदे बिहारला गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला, त्यानंतर कुटुंबाने कोथरूड पोलीस ठाण्यात शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. सोमवारी(14 एप्रिल) पाटण्यात शिंदे यांचा मृतदेह सापडला.
शिंदे यांचे अपहरण करून खून
अधिक माहिती अशी की, या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. स्क्रॅप डिलच्या बहाण्याने बोलवून त्यानंतर त्यांचे अपहरण करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींना अटक करत पोलिसांनी एक काळी स्कॉर्पिओ, एक लॅपटॉप आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त केले आहेत. शिंदे यांचे अपहरण करणारी टोळी लोकांचे अपहरण करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून त्यांना सोडून देत असावी, असा पोलीसांना संशय आहे. मात्र शिंदे यांचा खून केला.
दरम्यान, शिंदे यांना का मारले याचा शोध पोलीस घेत आहेत. उद्योगपती शिंदे यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पाटणा आणि जहानाबाद पोलिस संयुक्तपणे तपास करत आहेत.