पुणे: पुणे शहरातील एका उद्योजकाला 5 कोटींची खंडणी मागितल्याचा तसेच खंडणी न दिल्यास गोळी घालण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही धमकी देण्यासाठी पाकिस्तानातील मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 37 वर्षीय उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उद्योजक बोट क्लब रस्त्यावर राहण्यास आहे. उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उद्योजकाची एक एव्हीएशन कंपनी आहे. फिर्यादी उद्योजकाचा भारत, दुबई तसेच इंग्लंडमध्ये व्यवसाय आहे. या कंपनीतर्फे हेलिकॉप्टर आणि विमाने विक्री तसेच भाड्याने दिली जातात. व्यवसायामुळे उद्योजकाचा मोबाईल क्रमांक सर्वत्र प्रसारित झालेला आहे.
5 कोटी रुपयांची खंडणी मागितली
दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योजकाच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. हा मोबाईल क्रमांक पाकिस्तानील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या क्रमांकावरून उद्योजकाला एक व्हॉईस नोट पाठविण्यात आली होती. त्यात म्हटले होते की, ‘तू नवीन हेलिकॉप्टर खरेदी करीत आहेस. मात्र त्यापूर्वी काही रक्कम द्यावी लागेल’. असे त्या त्यात म्हटले होते. त्यानंतर उद्योजकाला पुन्हा एक मॅसेज पाठविण्यात आला. ‘तुझी संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. 5 कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे पाठवलेल्या मॅसेज मध्ये म्हटले होते.
त्यानंतर परत त्याच नंबर वरुण 28 फेब्रुवारी आणि 16 मार्चला उद्योजकाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पुन्हा संदेश पाठविण्यात आला होता. त्यातही त्याला थेट गोळी मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर घाबरलेल्या उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्या क्रमांकावरून उद्योजकाला धमकी देण्यात आली तो तो क्रमांक पाकिस्तानमधील आहे. खंडणीखोराने ‘प्रॉक्झी सर्व्हर’चा वापर करुन उद्योजकाला धमकाविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हे शाखा, व सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.