पुणे: पुण्यातील खराडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत राजस्थानातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अफूच्या बोंडांचा चुरा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. (Pune Crime)

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुकेश बिष्णोई (वय 30) असे असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. सध्या तो खराडी परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयितावर नजर ठेवली.

तपासादरम्यान आरोपीकडे असलेल्या दोन पोत्यांची झडती घेण्यात आली. त्यामध्ये अफूच्या बोंडांचा चुरा सापडला. पोलिसांनी तत्काळ तो साठा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन 13 किलो 80 ग्रॅम इतके असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख 61 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून आले, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि तो कोणाला विक्री करणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे खराडी परिसरात अमली पदार्थांचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे.







