पुणे: पुण्यातील वानवडी परिसरात प्लेसमेंट कंपनीच्या व्यवस्थापकाचे भरदिवसा पांढऱ्या रंगाच्या वॅगनआरमधून जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, वानवडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत या व्यवस्थापकाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपहरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिलाष प्रताप शिंदे (वय ३३, रा. उंड्री) असे सुटका करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ते मंगळवार पेठेतील स्टारवन असोसिएट या प्लेसमेंट कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात.

शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अभिलाष हे दुचाकीवरून घरी जात होते. वानवडीतील केदारी पेट्रोल पंपाजवळ पोहोचल्यानंतर कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा फोन आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि फोनवर बोलू लागले. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या वॅगनआरमधून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून पळ काढला.

अभिलाष यांच्याशी फोनवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला झटापटीचा आवाज आल्याने संशय आला. त्याने तातडीने अभिलाष यांच्या पत्नी जागृती शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर जागृती यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी केदारी पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून अपहरणाची घटना स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. कारचा माग काढताना ती घोरपडी पेठ परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून अभिलाष यांची सुटका केली. यावेळी कारचालक संदीप प्रदीप सावंत (वय ३३, रा. नेताजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, अपहरणामागील कारणाबाबत मात्र गूढ कायम आहे. सुटका झाल्यानंतर अभिलाष यांनी सुरुवातीला तक्रार देण्यास नकार दिला होता. नंतर पत्नीच्या आग्रहानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत अभिलाष यांनी आपल्याला जबरदस्तीने घोरपडी पेठेत नेण्यात आले आणि तेथे काही जण दारू पीत होते, असे सांगितले.
दुसरीकडे संदीप सावंत याने आपण फोनवर बोलत असताना तिघांनी आपली कार पळवून नेली आणि तिचा शोध घेत घोरपडी पेठेत आलो, असा दावा केला आहे. दोघांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याने पोलिसांना या प्रकरणात काहीतरी लपवले जात असल्याचा संशय आहे. अपहरणाचा प्लेसमेंट कंपनीतील व्यवहारांशी किंवा आरोपीच्या नोकरीशी काही संबंध आहे का, याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत.






