पुणे : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पित्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

या प्रकरणातील आरोपी २०२२ मध्ये आपल्या मुलीसह वीटभट्टीवर काम करण्यासाठी आला होता. २७ डिसेंबर २०२२ पासून त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरणात समोर आले. काही काळानंतर मुलगी गर्भवती असल्याचे समजताच आरोपी तिला सोडून पसार झाला.

दरम्यान, वीटभट्टी मालकाच्या पत्नीने पीडितेच्या नातेवाइकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मुलीची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी पित्याला दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पीडितेला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.






