पुणे: दूध, पनीर, खाद्यतेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मद्य आणि चायनीज पदार्थांकडे लक्ष वळवण्याचा निर्णय घेतला आहे. मद्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत असल्याने आगामी काळात मद्याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मुंढे यांनी एफडीएच्या आगामी कारवाईची माहिती दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी गावठी दारूमुळे २० जणांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत मुंढे यांनी मद्याच्या गुणवत्तेचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात या घटनेत चुकीच्या रसायनांचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे अल्कोहोलिक तसेच बिनअल्कोहोलिक पेयांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच चायनीज पदार्थांचीही तपासणी केली जाणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. अन्न सुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय असल्याने रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते; मात्र सध्या उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्न मिळणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
भेसळ रोखण्यासाठी उत्पादक, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. उत्पादकांनी दर्जेदार पदार्थ तयार करावेत, प्रशासनाने नियमित तपासणी व देखरेख ठेवावी आणि नागरिकांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याबाबत प्रश्न उपस्थित करावेत. या तिन्ही घटकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास अन्नातील भेसळ रोखणे शक्य होईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.







