पुणे: पुण्यातील धायरी भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पतीच्या अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले. त्यानंतर पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय 26, रा. गजानन संकुल, धायरी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती मल्लिकार्जुन मऱ्याप्पा चलवादी (वय 26 वर्ष) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्पाचे आरोपी मल्लिकार्जुनसोबत प्रेमसंबंध जुळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शिल्पाचे वडील भीमाप्पा चौडप्पा चलवादी (वय 53, रा. रेल्वे उड्डाणपुलाजवळ, मुंढवा) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी मल्लिकार्जुन ठेकेदार आहे. शिल्पाचा याआधीही एक विवाह झाला होता. मात्र सतत होणाऱ्या वादांमुळे ती पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. तिला तीन वर्षांचा मुलगा होता. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर शिल्पाचे आरोपी मल्लिकार्जुनसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला. त्यानंतर शिल्पा मल्लिकार्जुनसोबत आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत राहण्यास आली.
पतीचे दुसऱ्या मुलीसोबत अनैतिक संबंध…
दरम्यानच्या काळात शिल्पा गर्भवती राहिली. मात्र पती मल्लिकार्जुनचे दुसऱ्या एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर ती नैराश्यात गेली. त्यानंतर शुक्रवारी ( 11 एप्रिल) रोजी तिने आपल्या मुलाला बहीणीकडे देऊन आपण रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर धायरीत आपल्या घरी येऊन तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, शिल्पाच्या बहिणीने तिच्याशी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण शिल्पाशी संपर्क झाला नाही. त्यानंतर घडलेल्या घटणेबाबत बहिणीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर शिल्पाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शिल्पाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पती मल्लिकार्जुन याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.