पुणे: पुण्यात काहीदिवसापूर्वी मोक्का लागलेल्या आरोपीची सुटका झाली होती. मोक्का मधून सुटका झाल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका सुद्धा झाली होती. यानंतर पुणे पोलिस आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. शहरातील गुंड प्रवृत्त्तीच्या तरुणांना धडा शिकवण्याचा पोलिसांनी चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकी परिसरात आज पोलिसांनी तीन तरुणांची या परिसरातून खुली धिंड काढली आहे. काही दिवसांपूर्वी खडकी परिसरात या तरुणांनी धारदार शस्त्र-अस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना खाकीची ताकद दाखवत त्याच भागातून धिंड काढली आहे.
शहरात एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
दरम्यान, शहरात एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केलेल्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मनोरुग्ण आज संध्याकाळी साडे सहा वाजता मगर पट्टा भागात दगड फेक करत होता. अचानक एका जेष्ठ व्यक्तीला तो मारहाण करू लागला.
रासकर चौकात विरुद्ध दिशेने वाहने जाऊ नये म्हणून नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस शिपाई पवार यांनी भांडण सोडवण्यास गेले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने शिपाई पवार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.