पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात ऐन उन्हाळ्यात शेतीपंपांच्या केबल वायर चोरी करून तब्बल 150 शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या बिडीची थोटके, विशिष्ट प्रकारची तंबाखूची पुडी आणि पेयाच्या बाटल्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मध्य प्रदेशातील पाच सराईत चोरांना नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) परिसरातून अटक केली. या कारवाईमुळे केबल चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणात आरज्या छत्तेसिंग पवार (वय 19, रा. कटनी, मध्य प्रदेश), गगन शापिलाल चौहान (वय 19, रा. खंडवा, मध्य प्रदेश), अतुल शापिलाल चौहान (वय 21, रा. खंडवा, मध्य प्रदेश), तपसलाल सर्कस पवार (वय 50, रा. कटनी, मध्य प्रदेश) आणि सुरज रामसर आदिवासी (वय 40, रा. कटनी, मध्य प्रदेश) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नदीपात्रातील शेतीपंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध घटनास्थळांची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेली बिडीची थोटके, विशिष्ट प्रकारची तंबाखूची पुडी आणि पेयाच्या बाटल्या स्थानिक पातळीवर वापरल्या जात नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावरून चोरी करणारी टोळी परराज्यातील असल्याचा संशय बळावला आणि तपासाची दिशा बदलली.
गोपनीय माहितीदारामार्फत ही टोळी मध्य प्रदेशातील असून चोऱ्या करण्यासाठी विविध भागात फिरस्ते म्हणून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही टोळी नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) परिसरात असल्याचे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी केबल चोरीचे गुन्हे कबूल केले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि पारगाव परिसरातील केबल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आले असून 150 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने केली. सध्या सर्व आरोपी नारायणगाव पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.







