पुणे : शिक्षकांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकल्याने आणि त्यांनी अध्यापनावर बहिष्कार टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. संस्थेच्या तब्बल १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिले आहेत. यामध्ये सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, संस्थेच्या संबंधित माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तब्बल १८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी अध्यापनावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शाळांमधील नियमित अध्यापन विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले.
शिक्षण विभागाने वारंवार पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यापूर्वी २९ जून २०२६ पर्यंत नियमित आणि थकीत वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या खालील माध्यमिक शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.

१. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नन्हे
२. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव
३. सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव
४. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे
५. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर-एरंडवणे
६. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा
माध्यमिक शाळांबरोबरच संस्थेच्या चार प्राथमिक शाळांची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. यामध्ये पुढील शाळांचा समावेश आहे.
१. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव
२. सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव
३. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा
४. आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे
सुनावणीदरम्यान संस्थेने आपली आर्थिक अडचण मांडली. आरटीईअंतर्गत शासनाकडून मिळणारी शुल्कप्रतिपूर्ती मोठ्या प्रमाणात थकीत असल्याचे संस्थेने सांगितले. तसेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे वेतन आणि भत्त्यांवरील खर्च वाढला आहे. पालकांकडूनही संपूर्ण शुल्क वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा युक्तिवाद संस्थेने केला.
शासनाकडून आरटीईची थकीत रक्कम मिळाल्यास शिक्षकांचे वेतन देणे शक्य होईल, अशी बाजू संस्थेने सुनावणीदरम्यान मांडली. मात्र, यापूर्वी वेतन अदा करण्याचे निर्देश देऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने शिक्षण विभागाने मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शाळांची मान्यता रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांच्या समायोजनाची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी आणि शिक्षण यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून म्हणजेच १ मे २०२७ पासून होणार आहे. त्यामुळे संबंधित शाळा तात्काळ बंद होणार नाहीत. तसेच मान्यता रद्द करण्याच्या आदेशाविरोधात संस्थेला ३० दिवसांच्या आत शिक्षण संचालकांकडे अपील करण्याची संधी देण्यात आली आहे.
शिक्षकांचे थकीत वेतन, अध्यापनावर बहिष्कार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि संस्थेने मांडलेल्या आर्थिक अडचणी या पार्श्वभूमीवर सिंहगड संस्थेच्या १० शाळांवरील कारवाई पुण्यातील शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.







