पुणे: पुण्यातील धनकवडी मेघदूत सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही पर्वा न करता, तसेच कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय सोसायटीच्या इमारतीला असलेले मधमाश्यांचे पोळे काढल्याप्रकरणी सोसायटीच्या एका सदस्यांसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मध काढून व्यवसाय करणाऱ्यांवर करण्यात आला आहे.
गोविंद गोलाह मंडल (वय 38 वर्ष), प्रेमकुमार सूरज मंडल (वय 30, दोघे रा. शिंदेवस्ती, कॅनॉलजवळ, हडपसर) आणि मल्लिनाथ निंबाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित असित शाह (वय 44, रा. मेघदूत सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बेदरकारपणे कृती केल्याप्रकरणी तसेच मधाची बेकायदेशीर विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्लिनाथ निंबाळे हा देखील मेघदूत सोसायटीमधील रहिवासी आहे. बुधवारी (16 एप्रिल) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याने सोसायटीकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसताना गोविंद आणि प्रेमकुमार यांना सोसायटीमधील मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी बोलावले. त्यानंतर दोघेही दोरीच्या मदतीने गॅलरीमधून उतरले. तेथील जमिनीवर झाडाचा पाचोळा जाळून त्यांनी धूर केला आणि मधमाश्यांचे पोळे काढले. सोसायटीतील मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी आरोपींनी सोसायटीकडून पूर्वपरवानगी घेतली नव्हती. तसेच, सोसायटीमधील रहिवाशांच्या व लहान मुलांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता त्यांनी मधमाश्यांचे पोळे काढले.
दरम्यान, शाह यांनी या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल, अशा बेदरकारपणे कृती करून मधमाश्यांचे पोळे काढले आणि त्या मधाची बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.