पुणे : पुण्यातील कोंढवा भागात एका महिलेने पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असे आरोप करुन पोलीस ठाण्यातील प्रिंटर आपटून नुकसान केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
याप्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणीसह तिचे आई-वडील आणि अल्पवयीन भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई शिल्पा पवार यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शा राहायसकीय कामात अडथळा, धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी शहरातील वानवडी बाजार परिसरात वास्तव्यास आहेत. कोंढवा पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तिला तपासासाठी कोंढवा पाेलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तरुणी, तिचे वडील, आई आणि १४ वर्षांचा भाऊ मंगळवारी सायंकाळी कोंढवा पोलीस ठाण्यात आले होते. तिथे त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घातला.
पोलीस शिपाई अक्षया भुजबळ यांनी तरुणीला अनेकवेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने पोलीस शिपाई भुजबळ यांच्या हाताचा चावा घेतला. त्यांच्याशी वाद घातला, हुज्जत घातली. तिथे उभा असलेल्या तरुणीच्या आईने लाथांनी त्यांना मारहाण केली.
यादरम्यान पोलीस शिपाई पवार यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. ‘आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. असे आरोप त्यांनी केले. आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन तुम्हाला नोकरी वरुण घालवितो’, अशी धमकी वजाव भाषा वापरली. तिथेच असलेले पोलीस ठाण्यातील प्रिंटर जमिनीवर आदळून नुकसान केले. आता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन पठाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.