पुणे, ता. 14 : न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्याचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय नामदेव काळे ( पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, पुणे (वर्ग-2 , अराजपत्रित) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागांकडे तक्रार केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांच्या पतीला अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पतीला जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला.
दरम्यान, तक्रारदाराने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर तपास अधिकारी यांचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केळी असता, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तक्रारदाराकडेवरील कामासाठी सुरवातीस 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती 30 हजार रुपयाची लाच ठरली होती . तसेच ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार लोकसेवक दत्तात्रय काळे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रेम वाघमारे करीत आहेत.