पुणे : वाद सोडवल्याच्या क्षुल्लक कारणाचा राग मनात धरून विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदननगर येथे दोघांनी एका तरुणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या घटनेत त्या तरुणीला लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.15) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास खुळेवाडी येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ घडला. पोलिसांनी कारवाई करत सौरभ टिंगरे (वय-25) व संकेत टिंगरे (वय-18 दोघे रा. खुळेवाडी, चंदननगर) यांच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मित्र अनिकेत दोंडमणी याच्यासोबत असताना अनिकेतचा दोघा आरोपींसोबत वाद झाला. त्यानंतर वाद विकोपाला जाणार तोच तरूणी भांडण सोडवण्यासाठी गेली. त्यावेळी तरुणीच्या मध्यस्थीमुळे भांडण थांबले. ती मधे का आली? याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी तरुणीला मारहाण केली.