पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहर परिसरातील विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार पठारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण आणि गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पठारे आणि खांदवे यांच्यात लोहगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचे वृत्त होते. आता हे प्रकरण अधिक वाढले असून खांदवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आमदार पठारे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, पुतण्या (माजी नगरसेवक महेंद्र पठारे) आणि इतर नऊ जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
खांदवे यांना जबर मारहाण करणे आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेणे या आरोपांखाली हा गुन्हा नोंदवला गेला आहे. यापूर्वी, याच वादानंतर पठारे यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून बंडू खांदवे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खांदवे यांच्या तक्रारीवरून आमदार पठारे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







