पुणे : गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई गॅंगने देशभरात दहशत माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारल्यानंतर देशभर बिश्नोई गँगची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. अशातच पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाला बिश्नोई गॅंगकडून धमकीचा मेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईमेलद्वारे व्यावसायिकाकडे 15 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या घटनेने पुण्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
फसवणूक करण्यासाठी बिश्नोई गॅंगचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, बिश्नोई गॅंगचे नाव वापरुन काहीजण खोडसाळपणा करत असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर येऊन काम करत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात बिश्नोई गॅंगच्या नावाने एका व्यक्तीने एकास जिवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी देणा-या तरुणाला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने तपास करुन ताब्यात घेतलं आहे.