पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींचे स्केच पोलिसांनी जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत.
ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत.
नेमकं काय घडलं?
इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेली तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना एकटे गाठून धमकावत आडबाजूला नेले. तसेच आरोपींनी त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेत मित्राला मारहाण केली. त्याचा शर्ट काढून त्याचे हात बांधले. तसेच बेल्टने पाय बांधले आणि त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकूचा धाक दाखवत मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.
या प्रकारानंतर पीडित मुलीने बहिणीला घडलेला सर्व प्रसंग सांगितलं. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनाी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. क्राईम ब्रँच आणि कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे क्राईम ब्रँचने 10 पथके तयार केली आहेत.