पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. ही हत्या नेमकी कशी झाली, या बाबत पोलिसांनी महत्वाची अपडेट दिली आहे. पोलिसांना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सोमवारी (ता. 09) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला आहे. मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना सापडला आहे. ही हत्या लाकडी दांडक्याने मारून करण्यात आली असल्याचं समोर येत आहे.
नेमकं काय घडलं ?
सतीश वाघ हे ब्लु बेरी हॉटेलसमोर सोमवारी (ता. 09) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉक करीत होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून अपहरण करण्यात आलं आहे. मृतदेह सापडल्यानंतर मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यु नक्की कशाने झाला आहे ते समजेल असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हडपसर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही लोकांना सतीश वाघ यांच मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती यवत पोलीसांना दिली. पोलिसांनी वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटातून ताब्यात घेत ससुन रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठवला आहे. त्यांच्या डोक्यावर काही तरी कठीण वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. तर ते कुटुंबासोबत शेवाळवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील फुरसुंगी फाटा परिसरात राहतात. वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉकला चालले होते. त्यावेळी वाघ हे आकाश लॉन्स जवळ आले असता, तेव्हा एका गाडीतून आलेल्या अनोळखी इसमांनी त्याचे अपहरण केले. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.