पुणे : पर्वतीमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने अप्रत्यक्ष पत्ता कट केला आहे. मात्र, भिमाले यांनी मी पर्वतीतून लढणारच आणि जिंकणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे बंड हे निश्चित मानले जात आहे.
भिमाले म्हणाले की, मी विधिमंडळाची मागणी केली आहे. महामंडळाची नाही. राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबाबत ते म्हणाले की, मला पक्षाकडून अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नाही किंवा वरिष्ठांनी मला फोनही केला नाही. माझा निर्धार लढण्याचा आणि जिंकण्याचा आहे. पक्ष मला उमेदवारी देईल, असा मला विश्वास आहे. भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून मिसाळ सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना पक्षातीलच माजी नगरसेवक भिमाले यांनी आव्हान दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भिमाले यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून, ते उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. लोकसभा निवडणुकीनंतर भिमाले यांनी समाजमाध्यमात लढणार आणि जिंकणार, अशी पोस्ट केली होती.
निवडणुकीची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार मिसाळ यांची धाकधूकही वाढली होती. मात्र त्यांची कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे.