पुणे : दौंड तालुक्यात रविवारी (दि.09) रात्री भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे नव्याने काम सुरु होते. त्याच पुलाचे खांब कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड आणि गार या गावादरम्यान पुलाचे काम सुरू होते. 20 कोटी रुपये खर्चून हे काम सुरु होते. मात्र पूल उभारण्याचे काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत.
दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड या दोन गावांना जोडणा-या या पुलाचे काम सुरू होते. उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी पडली होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आणि धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले. रविवारी (दि.09) रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या कामावरील खांबाचा एक भाग कोसळला. त्यामुळे या कामाची पात्रता काय ? आणि हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे ? हे यावरून सिद्ध होते. जर या पुलाचे काम सुरू असल्यावर असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.
या पुलासाठी जवळपास 20 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे भुमीपूजन 2021 ला झाले. या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. तसेच पुलाचे काम करताना सतत अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचे स्थानिक नागरीक म्हणत आहेत.
नगर आणि पुण्यात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर लगेच पूलाचे खांब कोसळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.