लोणी काळभोर : पुणे-सोलापूर लोहमार्गावरील लोणी (ता. हवेली) रेल्वे स्थानकात बारामती शटल तब्बल एक तास थांबल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. 6) रात्री साडेसात तर साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यामुळे नोकरदार, विद्यार्थी व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून हावडा या दिशेने आजाद हिंद एक्सप्रेस दररोज जाते. हावडा एक्सप्रेस पुण्यातून साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातून सुटली. हावडा एक्सप्रेस दौंड च्या दिशेने जाताना काही गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. त्यात लोणी स्टेशन येथील स्थानकावर पुणे बारामती शटल थांबवण्यात आली होती.
दरम्यान, हावडा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पुण्याकडून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या एक तास उशिराने सोडण्यात येत आहेत. तर पुणे बारामती शटलला लोणी रेल्वे स्थानकावर तब्बल एक तास थांबवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तसेच पुण्यावरून दौंड च्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत एक तास उशिराने चालल्या होत्या.
याबाबत बोलताना लोणी काळभोर लोहमार्ग प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, पुणे-बारामती शटल ही अजूनही उरुळी रेल्वे स्थानकात 45 मिनिटे उभा राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दररोजच्या अडचणीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर उपयोजना कराव्यात.