पुणे : उत्तर भारतात शीत लहरी अतितीव्र झाल्याने महाराष्ट्र राज्यातही किमान तापमानात घट होताना दिसत आहे. १३ जानेवारीला राज्यात पुणे शह (१४.४ अंश) शहराचा पारा नीचांकी ठरला आहे. १७ जानेवारीपर्यंत राज्यात थंडीत वाढ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव काश्मीरपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागावर तीव्र झाला आहे.
तसेच हवेच्या वरच्या थरातही वान्याची चक्रीय स्थिती तीव्र आहे. तेथील तापमान ३ ते ८ अंशांवर खाली आले आहे. हवामान विभागाच्या रडारने टिपलेल्या चित्रात शीतलहरींचा प्रभाव १७ जानेवारीपर्यंत दाखविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात पुन्हा घट होताना दिसत आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत घट झाली होती. किमान तापमानाचा सरासरी पारा १५ ते २२ अंशांवर गेला होता. त्यामुळे उकाडा चांगलाच जाणवत होता. मात्र, शनिवारी राज्यातील किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट झाली. पुणे शहराचा पारा १७ ते २२ अंशांवर गेला होता. त्यात घट होऊन शुक्रवारी पारा १५, तर शनिवारी १४.४ अंशांवर खाली आला होता. शिवाजीनगरचे तापमान १४.४ तर एनडीए परिसराचा पारा १३.५ अंशांवर खाली आला होता.
असे होते शनिवारी किमान तापमान
पुणे १४.४, महाबळेश्वर १६.६, अहमदनगर १५.४, जळगाव १६.८, कोल्हापूर १८.२, नाशिक १५.७, सांगली १६.९, सातारा १५.५, सोलापूर २०.९, धाराशिव १९.४, छत्रपती संभाजीनगर १५.६, परभणी १७.३, नादेड १८.२. अकोला १८.४, अमरावती १७.१ बुलडाणा १७, चंद्रपूर १७, गोंदिया १५, नागपूर १६.६, वाशिम १५.४, मुंबई २३, रत्नागिरी २०.२