पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घटना घडत आहेत. त्यात आता आंदेकर टोळीतील गुंडाने तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. तसेच साथीदांराविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव वैभव चंद्रकांत गंगणे (वय-26, रा, सुमीत हाईट्स,1278, कसबा पेठ) असे आहे. याप्रकरणी ऋषभ देवदत्त आंदेकर (वय-25 रा. नाना पेठ) या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. तसेच यावेळी आंदेकर याचे साथीदार गणेश अशोक वड्डू, आयुष बिडकर, जयेश लोखंडे, पंकज वाघमारे यांच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत वैभव गंगणे यांनी फरासखान पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावेळी वैभव गंगणे आणि आरोपींमध्ये वादविवाद झाला होता. सोमवारी (दि.22) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास वैभव गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरामधून निघाले होते. त्यादरम्यान आरोपींनी गंगणे यांना आडवले. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन आरोपींनी गंगणे यांना मारहाण केली. मारहाण करुन शस्त्राने वार करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.