पुणे : पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारकडे प्रस्ताव दिला होता, तो स्वीकारला असून येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या नावासंदर्भात प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना दिले आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, पुण्यात नवीन विमानतळ तयार करण्यात येणार असून त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यायचे आहे. मात्र, पुण्यात जे विमानतळ आहे, ते नव्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. त्याचे नामकरण जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावावर आम्ही तात्काळ काम सुरू केले आहे. येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.