पुणे: पुणे विमानतळाने १३ एप्रिल रोजी नवा विक्रम रचला आहे. एका दिवसात १०५ विमानांनी उड्डाण केले तर १०५ विमान धावपट्टीवर उतरले. पुणे विमानतळाने या कामगिरीमुळे विक्रम रचत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एका दिवसात २१० विमानांची वाहतूक झाली आहे. ज्यामुळे अंदाजे ३३,००० प्रवाशांना प्रवास केला आहे. २०८ विमानांच्या हालचालींचा मागील विक्रम मोडला गेला आहे. विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्या मते, उन्हाळी हंगामासाठी विमानतळाला विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी २१८ स्लॉट वाटप केले आहेत, त्यापैकी २१० स्लॉट एअरलाइन्सनी बुक केले आहेत.
पुणे विमानतळावर प्रवाशांच्या वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे, विविध ठिकाणी जाणाऱ्या विमानांची संख्या वाढत आहे. विमानतळाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे वाढती मागणी कोणत्याही मोठ्या व्यत्ययाशिवाय पूर्ण होत आहे. प्रवासी वाहतूक आणि उड्डाण ऑपरेशन्समध्ये सतत वाढ होत असल्याने, विमानतळ भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.