पुणे: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे रविवारी घडलेल्या पूल दुर्घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 51 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते, ज्यांना सुदैवाने वाचवण्यात यश आले. या गंभीर घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत, इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जागे केले असून, जिल्ह्यातील सार्वजनिक संरचनेच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे.
मावळ येथील घटनेनंतर, पुणे महानगरपालिकेनेही शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. पुण्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया पालिकेने यापूर्वीच सुरू केली होती, पण तज्ज्ञ सल्लागारांच्या नेमणुकीअभावी ती रखडली होती. यापूर्वी ९८ मोठ्या पुलांचे ऑडिट पूर्ण केले असून, त्यापैकी ३८ पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यातील ११ पुलांची दुरुस्ती झाली असून उर्वरित ६२ पूल आणि सुमारे ४३८ कल्व्हर्टचे ऑडिट अद्याप बाकी आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नव्याने निविदा काढली आहे.








