पुणे : पुण्यात भरधाव कार दुभाजक तोडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना डेक्कन भागात असलेल्या गरवारे सर्कलजवळ घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या या छोट्या पुलावरून गाडी थेट खाली कोसळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार (दि.16) पहाटे तीन वाजता हा अपघात घडला. चालक भरधाव वेगात जंगली महाराज रस्त्यावरून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याकडे जात होता. त्यावेळी गरवारे पुलाजवळ आल्यावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक तोडून थेट खाली कोसळली गेली.
यावेळी रात्रीची वेळ असल्याने खाली असेलल्या ‘सब वे’ मध्ये कोणी नव्हते म्हणून कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या अपघातावेळी दुभाजकला दिलेली धडक जोरात असल्याचे बोलले जात आहे. कारण गाडीची एअरबॅग सुद्धा बाहेर आली आहे. अपघात झालेल्या गाडीतील ड्रायव्हरची ओळख अजून पटलेली नाही. या गाडीतील चालकाने मद्यप्राशन केले होते का असा प्रश्न सुद्धा उपस्थितीत झाला आहे.