Pune : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ म्हणून काम पाहणारे पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण घाडगे अडचणीत सापडले आहेत. गंभीर गैरप्रकार आणि पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून, थेट सेवेतून बडतर्फ करण्याची विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली आहे. (Pune)

गोपनीय चौकशीनंतर ही धक्कादायक बाब समोर आली. चौकशीत असं निष्पन्न झालं की, प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा आणि थेट पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत एका वादग्रस्त बिल्डरला मदत करण्याचा प्रयत्न केला. हा बिल्डर आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांनी पोलिस आयुक्तांच्या प्रवाचा धाक दाखवत सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या बिल्डर अविनाश पवार याला जमीन वादाच्या प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं चौकशीत उघड झालं. मात्र, एसीपी खटके यांनी स्पष्ट नकार देत हा प्रकार थेट उपायुक्त निखिल पिंगले यांच्या निदर्शनास आणला.
दरम्यान, अविनाश पवार याच्याविरोधात जमीन वादाच्या प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी काही नागरिक पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. ही तक्रार दाखल होऊ नये म्हणून पवारकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. या सगळ्यात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत होता आणि त्याचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचं तपासात समोर आलं.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने स्टॅनलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत स्टॅनलीने मोठा खुलासा करत, प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोडीसाठी प्रवीण घाडगे यांनी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केल्याचं सांगितलं. तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचं प्रकरण आपणच घाडगेंकडे नेल्याची कबुलीही त्याने दिली.
एकीकडे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळीविरोधात जोरदार कारवाई सुरू असताना, पोलिस दलातीलच एक कर्मचारी त्या टोळीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचं उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याआधीही प्रवीण घाडगे यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांच्या नावावर फोन करून प्रकरणं निकाली काढण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.
पीआरओ पदाचा गैरवापर करत बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत घाडगेंना निलंबित केलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.







