पुणे : सोशल मिडियावर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हूज मिळावे यासाठी आपला जीव धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने ‘स्टंटबाजी’ करत ‘रिल्स’बाजी करणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-बेंगलूरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ एका जुन्या पडक्या उंच इमारतीवर ही स्टंटबाजी करण्यात आली होती.
समाज माध्यमात याबाबतची चित्रफीत प्रसारित होताच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत भादंवि कलम ३३६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला. पोलीस त्या रील्स बनवणाऱ्या तरुण तरुणींचा शोध घेत आहेत.
नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदीरच्या समोर महामार्गालगत एक पडकी उंच गोलाकार इमारत आहे. या पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांनी आपला जिव धोक्यात घालत व्हीडीओ तयार केला होता. हा तरुण इमारतीच्या छतावर असून ती मुलगी त्याचा हात धरून लटकलेली दिसत आहे. याचा रिल्स या तिघांनी तयार केल्या होत्या. ही रिल सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.
त्यावेळी भारती विद्यापीठ पोलिसांनी व्हीडीओची खात्री केली. तसेच अनोळखी तरुण मुलगा व एक अनोळखी तरुण मुलगी यांच्यावर स्वतःचे व इतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली आहे. त्या अनुषंगाने ही बाब गंभीर असल्याचे समोर आले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत गुन्हा नोंदवला. तसेच पोलीस त्या रील्स बनवणाऱ्या तरुण तरुणींचा शोध घेत आहेत.