विजय लोखंडे
वाघोली: बकोरी (ता.हवेली) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पुनम वारघडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सरपंच शांताबाई गायकवाड, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वारघडे, संतोष वारघडे, द्रोपदी वारघडे, अंजना बहिरट, ग्रामसेवक आनंदा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
संतोष रानबा वारघडे यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक बकोरी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी ग्रामसेवक आनंदा कांबळे यांच्या अधिपत्याखाली व सरपंच शांताबाई सत्यवान गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये उपसरपंचपदासाठी पुनम सुनिल वारघडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुनम वारघडे यांचा बकोरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संतोष वारघडे पाटील, मस्कू बहिरट, अशोकराव वारघडे, संजय वारघडे, रामदास वारघडे, दत्तात्रय वारघडे, सागर वारघडे, सुनिल वारघडे, माजी सरपंच नवनाथ वारघडे, कृष्णा कोलते, महेश वारघडे, पंडित वारघडे, अंकुश वारघडे, प्रसाद वारघडे, गणेश बहिरट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बकोरी गावची वाटचाल प्रगतीच्या मार्गांवर असून यापुढे उपसरपंचपदावर काम करताना गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. बकोरी ते वाघोली हा मुख्य रस्ता भक्कम दर्जाचा बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-पुनम वारघडे, नवनिर्वाचित उपसरपंच, बकोरी ग्रामपंचायत