पुणे : किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पतीसोबत त्याची प्रेयसी बोलत असल्याचा राग अनावर झाल्याने पत्नीने प्रेयसीला बेदम मारहाण केली. तर मुलीने डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना चतु:श्रृंगी माता मंदिराच्या कमानीच्या आतील उपाहारगृहासमोर रविवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सेनापती बापट रस्ता परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन वडारवाडी येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिला आणि तिच्या २१ वर्षीय मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे आणि फिर्यादीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. विवाहानंतर देखील दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याने आरोपी महिलेसोबत यापूर्वी देखील वाद झाले होते. यामुळे फिर्यादींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग महिलेच्या मनात होता.
दरम्यान, फिर्यादी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चतु:श्रृंगी माता मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिला आणि त्यांची मुलगी मंदिरात आल्या. ‘तु माझ्या नवऱ्यासोबत का बोलतेस, त्याला का भेटतेस’ असा जाब विचारत महिलेने फिर्यादीला बेदम मारहाण केली. तर मुलीने फिर्यादीचे केस ओढून सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारहाण केली.