यवत : मकरंद अनासपुरे याचा जाऊ तिथं खाऊ हा मराठी चित्रपट तुम्हाला आठवतो का? प्रशासनावर कडक प्रहार करण्यासाठी यात नायक त्याची विहीर चोरी झाल्याची तक्रार करतो आणि भ्रष्टाचाऱ्यांची भांडाफोड होते. अगदी असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तांबेवाडी गावात घडला आहे.
सध्या तांबेवाडी गावात सार्वजनिक आड चोरीला गेल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यानुसार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खामगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी पाहणीसाठी गेले होते. सार्वजनिक जागेतील शासकीय आड बुजवून पत्रा शेड बांधकाम करून अतिक्रमण कल्याचे या पथकाला पाहणीदरम्यान आढळून आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार बहिरट देखील उपस्थित होते. त्यानंतर आड बुजवलेल्या ठिकाणाची पाहणी केल्याचा राग मनात धरून गणेश दिनकर पिंगळे यांनी बहिरट यांना शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बहिरट यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
ग्रामसेवकांनी दिली नोटीस
सार्वजनिक जागेतील शासकीय आड बुजवून पत्रा शेड बांधकाम करून अतिक्रमण कल्याचे या पथकाला पाहणी दरम्यान आढळून आल्यानंतर ग्रामसेवक पी. नाळे यांनी अतिक्रमणधारक गणेश पिंगळे यांना नोटीस दिली आहे. या नोटिसीमध्ये तांबेवाडी येथील ग्रामपंचायत मालकीची मिळकत नंबर ०३/०३१/२२५९ मधील बखळ जागा ५०’ x ३२=१६०० चौ फुट मधील सार्वजनिक जागेतील शासकीय आड बुजवून पत्रा शेड बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे. तरी सदरचे बांधकाम ७ दिवसात स्वताः काढून घ्यावे, अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम नंबर ५२,५३ प्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी नाळे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गावातील सार्वजनिक आड बुजवून त्याठिकाणी बांधकाम सुरु असल्याचे अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सांगितले असता ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो. याचा राग मनात धरून आरोपी गणेश दिनकर पिंगळे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे
तुषार बहिरट, ग्रामपंचायत सदस्य