लोणी काळभोर : महिलांना आत्मभानाबरोबर समाजभान असणे खूप गरजेचे माहे. समाजात घडणा-या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्याकडे डोळसपणे पाहणे खूप गरजेचे आहे. आजुबाजूला घडणा-या गोष्टींवर महिलांचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते, असे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मानसशास्त्रज्ञ डॉ. पल्लवी ईनामदार यांनी व्यक्त केले.
कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील यथार्थ योग स्टुडिओ यांच्या वतीने प्रेरणा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी “आत्मभानाकडून समाजभानाकडे” या विषयावर डॉ. पल्लवी इनामदार बोलत होत्या. यावेळी क्षितीज संस्थेच्या संस्थापक उमाताई माने, अभिनेत्री प्रतिभा दाते, डॉ. धनश्री दांडगे, यथार्थ योग स्टुडिओच्या संस्थापिका शिल्पा कोलते, कदंब फाउंडेशनचे नितीन कोलते, सोनाली काळभोर, परिमला पांडे, विद्या काळभोर, सारिका देशमुख आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजन कदंब फाउंडेशनने केले होते.
यावेळी बोलताना डॉ. पल्लवी ईनामदार पुढे म्हणाल्या, महिलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांनी स्वतः सकारात्मक राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने मानसिक व भावनिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो, तणाव कमी होतो, स्मरणशक्ती सुधारते, सकारात्मकता येते. रक्तात हिमोग्लोबिन कमी होणारा थॅलेसेमिया नावाचा आजार महिलांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा आजार अनुवंशिक असून लग्नाअगोदर वधू-वरांची व गरोदरपणात महिलांची रक्त तपासणी केल्यास यावर उपाय करता येऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून काम करणा-या व ओळख स्पर्शाची, नैतिक मुल्य, उमलत्या वयातील प्रश्न आदी विषयांवर मार्गदर्शन करणा-या परिमला पांडे, गेल्या 15 वर्षांपासून महिला बचतगट चालवून महिलांचे आर्थिक प्रश्न सोडवणा-या विद्या काळभोर, सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडवून महिलांना शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करणा-या सारिका देशमुख या तिघींना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यथार्थ योग स्टुडिओच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा कोलते यांनी केले. यावेळी कदंब फाउंडेशनच्या कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष नितीन कोलते यांनी घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुरा कोलते यांनी तर उपस्थितांचे आभार सोनाली काळभोर यांनी मानले.