पुणे : पुण्यातील १४ वर्षीय साई कवाडेने भीम पराक्रम केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत असलेल्या दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोंकागुआ या ठिकाणी ४३७० मीटर अंतर पार करून प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकाविला आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.
साईने १७ जानेवारी रोजी मोहीम सुरू केली. सहकारी ट्रेकर डॉ. सीमा पाटील आणि अंबादास गायकवाड यांच्यासोबत साईच्या टीमने दोन दिवसांनंतर ४३७० मीटर उंचीवर असलेल्या प्लाझा डी मुलास बेस कॅम्पवर पोहोचण्यासाठी पुएंटे डेल इंका कॅम्प आणि कॉन्फ्लुएन्सिया कॅम्पच्या कठीण पॅचमधून मार्ग काढला. हा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा मानला जातो.
ही मोहीम सुरु असताना, हिमवादळामुळे हवामानावर परिणाम झाला होता. तापमान -२० डिग्री सेल्सियस ते -३० डिग्री सेल्सियस दरम्यान होते आणि वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यावेळी ही मोहीम तीन दिवसांसाठी थांबवण्यात आली होती. पण वातावरणात सुधारणा होत नसल्याने डॉक्टर आणि रेंजर्सच्या मार्गदर्शकाने मोहीम थांबवण्याचा आणि पुढे न चढण्याचा निर्णय घेतला होता. हवामान खराब असतानाही साईने २६ जानेवारी रोजी देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी प्लाझा डी मुलास बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला.
दरम्यान, साई अल्पवयीन असल्याने अर्जेंटिनामधील गिर्यारोहणाच्या नियमांनुसार कायदेशीर मान्यता आवश्यक होती. त्यामुळे साई आणि त्याच्या वडिलांनी अर्जेंटिनामधील न्यायालयाकडून मान्यता मिळवली. अर्जेंटिनामधील न्यायालयाने कायदेशीर अटी आणि प्रक्रिया मंजूर केल्यानंतर ही मोहीम सुरु झाली होती.
साई भारती विद्यापीठ शाळेत आठवीत शिकतो. तो उत्तम गिर्यारोहक आहे आणि त्याने स्टोक कांगरी शिखर, आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर आणि युरोपमधील एल्ब्रस शिखर तसेच गेल्या वर्षी तेनझिंग हिलरी एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण केली आहे. त्याच्या मोहिमांसाठी त्रियामा लीगल, पुनित बालन ग्रुपचे ऑक्सीरिच, एमबीए आणि लायन्स क्लब पुणे यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली आहे.
याबाबत बोलताना सुधीर कवाडे म्हणाले कि, साईचा ट्रेकींगचा प्रवास इथंपर्यंत थांबणार नाही आहे तर त्याला जगातील अनेक मोठे मोठे ट्रेक करायचे आहे. सध्या तो १४ वर्षांचा आहे. दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनकाग्वा नंतर त्याला अमेरिकेतील माऊंट डेनालीवर चढण्याचे आहे. आतापर्यंत पूर्ण केलेल्या ट्रेकच्या मागे त्याची जिद्द आणि मेहनत आहे.