दौंड, (पुणे) : पारगाव (ता. दौंड) या ठिकाणी वर्षातील ३६५ दिवस दररोज छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य नियमाने आरती केली जाते. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरतीचा शुभारंभ केला जातो. इतकेच नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबही यात सहभागी होतात.
पारगाव येथे १९८५ साली लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी गावातून ५१ हजार रुपये वर्गणी गोळा करून हा पुतळा उभारण्यात आला होता. गावातील प्रत्येक सण कार्याला तसेच निवडणूक प्रचाराचा शुभारंभ, तुकाई देवी यात्रेचा छबिण्याचा शुभारंभ, कोणत्याही आंदोलनाचा शुभारंभ या पुतळ्याला नतमस्तक होऊन हार घालून पुढील कार्यक्रम केला जातो.
वर्षांच्या ३६५ दिवस विद्यार्थी व ग्रामस्थ सायंकाळी ८ वाजता पुतळ्यासमोर जमा होतात. पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि साऊंड सिस्टिम लावून नित्यनियमाने छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते. यावेळी गावातील प्रत्येक माणूस आहे त्या ठिकाणाहून किंवा आपल्या घरातून या आरतीमध्ये सहभागी होतो. यात आणखी एक विशेष म्हणजे छत्रपतींच्या पुतळ्याला दररोज हार देण्याचे काम प्रसाद ताकवणे हा युवक नित्य नियमाने करतो.
शालेय विद्यार्थी महाराजांच्या पुतळ्यासमोर मर्दानी खेळ खेळतात. भविष्यात ग्रामस्थांच्या योगदानातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान साकार करण्याचा मानस आहे. तसेच प्रत्येक शिवजयंती महोत्सवाला या उद्यान परिसरात समितीच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात येते.
यंदाच्या शिवजयंती निमित्त गावातील युवकांनी ५० हजार रुपये खर्चून मिरवणुकीसाठी नवीन छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती आणली आहे. दौंड तालुक्यातील या गावाचा उपक्रम सर्वांना प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारा आहे.
दरम्यान, शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर व पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत, कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी मदत येथील शिवप्रेमींनी केली आहे.
अशी माहिती शिवप्रेमी असलेले समीर बोत्रे यांनी दिली आहे.