यवत : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने होणाऱ्या कारवाईविरोधात दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. दौंड तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस, दौंड तालुका व शहर यांच्या वतीने आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदवण्यात आला.
रोहित पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून कारवाई करत आहे. त्याविरोधात केंद्र व राज्य सरकार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, दौंड तालुका युवक अध्यक्ष सचिन काळभोर, दौंड शहर युवक अध्यक्ष सचिन गायकवाड, युवक उपाध्यक्ष भाऊसाहेब फडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.