पुणे : विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच हॉलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी विविध कलांचेही शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देत असताना त्यांना आपली संस्कृती व परंपरांचा देखील सातत्याने सहवास द्यायला हवा. अगदी तशाच पद्धतीचे शिक्षण एमआयटी एडीटी विद्यापीठातून विद्यार्थ्यांना मिळत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझा सन्मान संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन व टाळ-मृदुंगाच्या गजरात करण्यात आला, यासारखे दुसरे भाग्य नाही, असे गौरोवोद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी काढले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’ निमित्ताने आयोजित ‘पर्सोना ऑफ द ईअर’ पुरस्कार वितरण समारंभात चौधरी बोलत होते. याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, प्रसिद्ध लेखक शरद तांदळे, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी ‘मिटकॉम’च्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, डॉ. संजय उपाध्याय, प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. रजनीश कौर, सचदेव-बेदी, डॉ.नचिकेत ठाकूर, डॉ. मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून अंकुश चौधरी, आदिनाथ कोठारे, वंदना सेहगल आणि शरद तांदळे यांच्यासह विद्यापीठातील १८ विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल ‘पर्सोना ऑफ द ईअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी बोलताना अंकुश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत महाविद्यालयीन दिवसांचा पूरेपुर आनंद लुटण्याचे आवाहन केले. ‘एमआयटी एडीटी’ इतका सुंदर कँम्पस आजवर पाहिला नसल्याचे म्हणत भरभरून कौतुक केले.
प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी यावेळी बोलताना अध्यात्माच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधत असताना विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण कसे प्रदान करता येईल याबद्दल विस्तृतपणे आपले विचार मांडले. तसेच त्यांनी सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रस्थासोबत सायबर गुन्हेगारीही वाढली आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. ही सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी वंदना सेहगल यांच्यासारख्या सायबर सिक्युरिटी तज्ञांचा मोठा हातभार लागत असल्यानेच त्यांना ‘वर्षातील सर्वोत्तम पर्सोना’ हा पुरस्कार प्रदान करत असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण व सोबत त्यांच्यातील कलागुणांसह संशोधनवृत्तीला वाव देऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पर्सोना फेस्ट’ची संकल्पना मी मांडली. ‘पर्सोना’च्या माध्यमातूनच देशाच्या कला, विज्ञान, तंत्रज्ञान संस्कृतीत भर घालण्याचा उद्देश होता व आज प्रा. डॉ. मंगेश कराड व त्यांच्या टिमने अतिशय प्रभावीपणे दरवर्षी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविल्याचा मला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्ने पहा!
सामाजिक जीवनात द्वेशपूर्ण काम न करता प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांप्रमाणे रचनात्मक काम करत राहिल्यास माणूस नक्कीच मोठा होतो. खरंतर ९० टक्के लोकांची यशस्वी झाल्यानंतरची भाषणे तयार असतात; परंतु त्यांचे यशस्वी होणे बाकी असते. ‘गुत्तेदार’ या शब्दापासून सुरु झालेला माझा प्रवास आज ‘आंत्रप्रन्योर’पर्यंत येवून पोचल्याचा आनंद आहे आणि ‘एमआयटी एडीटी’चा पुरस्कार स्विकारताना एक वर्तूळ पूर्ण झाल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो जोपर्यंत मार्ग सापडत नाही तोपर्यंत वाचत रहा आणि मोठी स्पप्ने पहा, असे आवाहन प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांनी याप्रसंगी केले.