पुणे : ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली मुलींकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यातील सैनिक विहार, एनआयबीएम रोड येथील ‘इरेना स्पा’ येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या स्पा सेंटरवर कारवाई करून दोन थायलंड तर एका भारतीय मुलीची सुटका केली आहे. तर स्पाचा मालक व व्यवस्थापक या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘इरेना स्पा’ चे व्यवस्थापक राजेश भोसले (वय २६, रा. सैनिक विहार) व मालक निखिल राजेंद्र नाईक (वय २६, रा. ग्रीन पार्क सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा पोलिसांनी त्या स्पावर छापा टाकला व आरोपींकडून ७६ हजारांचे तीन मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.