योगेश शेंडगे
शिक्रापूर: रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय सुरु आहे. विशेष म्हणजे रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाच्या तरी आशिर्वादाने हा वेश्या व्यवसाय सुरु आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरु आहे.
रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत यापूर्वीही यश इन चौकात असणाऱ्या एका चार मजली इमारतीत वेश्या व्यवसाय सुरु होता. त्यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयातील एका अधिकाऱ्याने कारवाई करत संबंधित इमारतीच्या मालकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवस सर्वत्र शांतता होती. आता रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये परत एकदा वेश्याव्यवसाय सुरु झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यावर रांजणगाव पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
यश इन चौक अवैध व्यवसायांचा अड्डा
रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत सध्या गुटका, मटका, गावठी दारु तसेच गांजा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. तसेच येथे दारुविक्री करणारे मोठे दुकान असल्याने सायंकाळच्या वेळेस यश इन चौकात मोठया प्रमाणात तळीरामांची गर्दी असते. तेथूनच काही अंतरावर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असल्याने या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिला कामगारांची विनाकारण कुचंबना होते.
सामाजिक कार्यकर्त्याचे निवेदन, पण परिस्थिती ‘जैसे थे’
याबाबत काही दिवसांपुर्वी एक सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेने शिरुरचे उपविभागीय अधिकारी आणि रांजणगाव पोलिस स्टेशनला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवस हा सर्व प्रकार थांबला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणहून पोलिस स्टेशनला जाण्या-येण्याचा रस्ता आहे. अनेक पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी येथूनच पोलिस स्टेशनला जात-येत असतात. मग त्यांना हा गैरप्रकार दिसत नाही का? किंवा हा गैरप्रकार दिसूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.