राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेलवर वेशाव्यावसाय रॅकेटचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई १६ मे रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी दोन जणांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एका तरुणीची सुटका केली असून त्यांच्याकडून एक मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ७० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस शिपाई प्रणव ननवरे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वैभव दिपक पाटील (वय-२४, सध्या रा. सागर लॉज केडगाव, मुळ रा. टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापुर) आणि अक्षय विलास मांढरे (वय-२३ रा. वरवंड, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या केडगाव येथील सागर लॉज येथे अवैद्यरित्या वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती यावत पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दोघे जण एका मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले.
तसेच त्यांच्याकडून एक मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ७१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत यावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश शेळके करत आहेत.