पुणे : पुणे-पुरंदर हवेलीतील विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै २०२४ रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ ९ गावातील मालमत्ता कर ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुप्पट दराने कर आकारण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.
तसेच सदर ९ गावांचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुप्पटीपेक्षा जास्त होणार नाही, अशा पद्धतीने पुनर्विलोकन करेपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्यात यावी, असे आदेशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान, या ९ गावांप्रमाणे पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांसाठी आदेश देण्याची विनंती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि भिमराव तापकीर यांनी केली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावातील मालमत्ता कर हा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुप्पट दराने आकारण्यात यावा आणि सदर गावांचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुप्पटीपेक्षा जास्त होणार नाही, अशा पद्धतीने पुनर्विलोकन करेपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० (अ) अन्वये निर्देश देण्यात येत आहे.