लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हेच फुरसुंगी (ता. हवेली) येथील महिला क्रीडापटू मनीषा नामदेव गारगोटे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडून क्रीडा मार्गदर्शक पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. मनीषा गारगोटे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणीक, क्रीडा व शासकीय क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या गट ब संवर्गासाठी सरळ सेवा भरती सन 2023 मधील क्रीडा मार्गदर्शक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत मनीषा गारगोटे यांनी यश संपादन करून क्रीडा मार्गदर्शक पदाला गवसणी घातली आहे.
मनीषा यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक आहे. त्यांचे वडील नामदेव गारगोटे हे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. तर आई विजया या गृहिणी आहेत. गारगोटे दाम्पत्यांना तिन मुली आहेत. त्यातील मनीषा ही मोठी मुलगी आहे. मनिषाचे प्राथमिक शिक्षण भेकराईनगर येथील साने गुरुजी शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण भेकराई माता माध्यमिक विद्यालयातून घेतले.
मनीषा यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. मनीषा सातवीत असताना सन 1999 साली रायपुर (छत्तीसगड) येथे पहिली राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा खेळली. या स्पर्धेत मनीषाने सुवर्ण पदक पटकाविले. मनीषाने पदवी, बी पी एड, एम पी एड चे व्यावसायिक शिक्षण घेतले. तर सन 2007-08 चा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मनीषाला हँडबॉल या खेळासाठी मिळाला आहे.
दरम्यान, सन २००९ साली मनीषा यांचा दीपक भोरेकर यांच्याशी विवाह झाला. या दोघांना एक मुलगा आहे. मनीषाने मुलाची व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र आपणही मोठे होऊन शासकीय नोकरी करायची. असे बालपणापासून मनीषाने स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न मनीषाला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर मनीषाने हँडबॉल खेळासह अभ्यास करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या गट ब संवर्गासाठी सरळसेवा भरती सन 2023 मधील क्रीडा मार्गदर्शक पदाची परीक्षा मनीषाने दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात मनीषा उत्तीर्ण झाली आहे. आणि मुंबई उपनगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा मार्गदर्शक म्हणून लवकरच रुजू होणार आहे. मनीषा यांनी कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे स्पर्धा अनेक महिलांसह मुलींना प्रेरणा मिळाली आहे.
या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, पती व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करते. या यशासाठी मला क्रीडा शिक्षक राजेंद्र राऊत, राहुल चव्हाण, रुपेश मोरे, तानाजी देशमुख, राजेश गारडे व सुदेश बनकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. मनीषाने आपल्या आईवडीलांच्या बरोबर शिक्षकांचे आभार मानले. कारण त्यांच्या संस्कारातून शिकण्याची संधी मिळाली व वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले.
मनीषा गारगोटे ( क्रीडा मार्गदर्शक पदाची परीक्षा उत्तीर्ण)