लोणी काळभोर : जगातील सर्वात मोठा युट्यूबर महिन्याला 13 कोटी रुपये सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवतो. पुण्यातील काही युट्यूबरही पाच ते सहा लाख रुपये महिन्याला कमवत आहेत. आपण ही सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर आपणही चांगल्या प्रकारे अर्थाजन करु शकतो, असे मत डिजिटल मीडिया तज्ञ डॉ. पियुष गिरगावकर यांनी व्यक्त केले.
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे सोशल मिडीयाच्या माध्यमातून अर्थाजन कसे करावे यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना डॉ. पियुष गिरगावकर बोलत होते. यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुनील जगताप, उपाध्यक्ष तथा ‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, ज्येष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, सचिन सुंबे, अमोल अडागळे, अमोल भोसले, गोरख कामठे, श्रीनिवास पाटील, रियाज शेख, आकाश कुलकर्णी, आकाश दांडगे हनुमंत चिकणे, विशाल कदम, प्रावी कन्सल्टन्सचे संचालक मल्हार पांडे, विश्वराज हॉस्पिटलचे विनोद गजबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना गिरगावकर म्हणाले, आपल्या सगळ्यांमध्ये उत्तम कंटेंट डेव्हलपर्स असतो. फक्त आपल्यातील आळस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीच्या अभावामुळे आपले कंटेंट अनेकजण डेव्हलप करत नाहीत. आर्टिफिशियल टेक्निक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल ज्ञान असणे आणि रोजच्या आयुष्यात त्याचा वापर होणे हे गरजेचे आहे.
डिजिटल युगातून इंटरनेटचा वापर करून पैसे कमवावेत, यासाठी उपयुक्त असलेला सोशल मीडियाचा वापर व त्यातील बारकावे यांची सखोल माहिती त्यांनी यावेळी दिली. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमांवर कंटेंट व्हायरल कसे होतात. या विषयावर गिरगावकर यांनी माहितीचे दृक श्राव्य सादरीकरण केले.
यावेळी बोलताना प्रावी कन्सल्टन्स मॅनेजमेंटचे संचालक मल्हार पांडे म्हणाले, ‘कंटेंट डेव्हलप करण्यासाठी वारंवार पोस्ट करायला पाहिजेत. लोकउपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. तसेच सर्वांनी इंटरनेटचा पुरेपूर वापर केला पाहिजे. उपस्थितांचे स्वागत व आभार संदीप बोडके यांनी मानले.