भिगवण: प्राध्यापक रामदास झोळ हे राज्यातील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाबरोबर इतर मागास वर्गाप्रमाणे शैक्षणिक सुविधा जसे की, शैक्षणिक फी, वसतिगृहभत्ता, शिष्यवृत्तीसाठी इतर समाज बांधवांप्रमाणे अभ्यासक्रमांच्या संख्येमध्ये वाढ करणे या गोष्टींसाठी मागील सहा वर्षांपासून शासन स्तरावर प्रयत्न करत होते. त्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शरद पवार व मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टींबाबत वारंवार मागणी करत होते. आता या सर्व मागण्यांना यश आले, असे म्हणता येईल.
या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातून प्राध्यापक रामदास झोळ यांना फोन करून अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर चार नोव्हेंबर रोजी पुन्हा मंगेश चिवटे यांनी प्राध्यापक रामदास झोळ यांना फोन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सचिव व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे झाल्याबद्दल कळविले. त्या बैठकीध्ये झोळ यांनी दिलेले विषय व योजनाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. या सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक होऊन शिक्षणामध्ये सुविधेतील समानता राबवण्याचे धोरण ठरले. त्यामध्ये बार्टी, सारथी व महाज्योतमधील सर्व योजना आणि सवलती एकसारख्या करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील पालकांना नॉन क्रिमिलियरची मर्यादा लावून गरिबांना शैक्षणिक सवलतीचा फायदा व्हावा म्हणून विविध निर्णय घेण्यात आले.