सांगवी(पिंपरी-चिंचवड) : पीएचडी डीग्रीसाठी प्रबंध सादर करणे आणि त्याला अप्रुव्हल देण्यासाठी पंचवीस हजारांच्या लाचेची करण्यात आली होती. त्यामधील वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पीएचडी मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापिकेला रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे विभागाने शनिवार ३० मार्च रोजी सांगवी येथे ही कारवाई केली.
डाॅ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९) असे ताब्यात घेण्यात आलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. डाॅ. माने या पिंपरी चिंचवडमधील सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शक आहे. या प्रकरणी एका ४० वर्षीय प्राध्यापकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पुणे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएचडी डीग्री मिळवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता एक ऑनलाइन प्रबंध तयार केला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार प्राध्यापकांचे मार्गदर्शकम्हणून डाॅ. शकुंतला माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तक्रारदार प्राध्यापकाने सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे आणि त्यावर अप्रुव्हल देण्यासाठी डाॅ. शकुंतला माने यांनी सदर प्राध्यापकाकडे पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार प्राध्यापकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, डाॅ. माने यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचेच्या पंचवीस हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये स्वीकारताना डाॅ. माने यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करीत आहेत.