पुणे: शालेय शिक्षण विभागाने राज्यातील (Private Classes New Rules) शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांमधील विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या (Coaching Classes Regulation) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामध्ये तक्रार निवारण यंत्रणा, मानसिक आरोग्य सेवा आणि शिकवणी वर्गांवरील काही बंधनांचा समावेश आहे.

या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य असतील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नियुक्त सामाजिक कार्यकर्ता आणि बालमानसतज्ज्ञ हे नामनिर्देशित सदस्य म्हणून काम पाहतील.

शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये किमान एक पात्र समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. शंभरपेक्षा कमी विद्यार्थिसंख्या असलेल्या संस्थांना बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत घ्यावी लागणार आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापक आणि कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा प्रमाणित मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

खासगी शिकवणी वर्गांना एका महिन्याच्या आत स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी लागणार आहे. तक्रार नोंदविण्याची पद्धत, जबाबदार अधिकारी आणि निवारणाची कार्यपद्धती अधिकृत संकेतस्थळावर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. तसेच टेलिमानस आणि आत्महत्या प्रतिबंधात्मक हेल्पलाइनचे क्रमांक वसतिगृह, वर्गखोल्या, सामायिक वापराची ठिकाणे आणि संकेतस्थळावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिकवणी वर्गांसाठी वेळापत्रक विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही असे असावे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि प्रशिक्षकांना आठवड्यात किमान एक सुटी देणे आवश्यक आहे. सुटीनंतरच्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी घेऊ नये. एका दिवसात शिकवणीचे तास 5 पेक्षा अधिक नसावेत आणि तासिका फार लवकर सकाळी किंवा फार उशिरा संध्याकाळी ठेवू नयेत.
शिक्षण विभागाने ‘स्पर्धा परीक्षेतील यशाची हमी नको’ या शीर्षकाखाली खास सूचना दिली आहे. खासगी शिकवणी वर्गात प्रवेश मिळाल्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यशाची कोणतीही हमी नसते, हे विद्यार्थी आणि पालकांना स्पष्टपणे सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी होईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समित्या या सूचनांची अंमलबजावणी करणार असून तक्रारींचे निवारण करतील. खासगी शिकवणी वर्गांनाही या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.







