राजेंद्रकुमार शेळके
पिंपरी : चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी जुन्नरच्या रहिवासी व चिखली कुदळवाडी येथील विद्यार्थी विचार प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रीती राहुल लांडगे यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रिती लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना पिंपरी-चिंचवड तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी व्यासपीठावर राष्ट्रपती पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश प्रभुणे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, प्रदीप कदम, हरिश्चंद्र गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष कैलास पवळे, कार्याध्यक्ष अशोक जाधव, सचिव संभाजी पडळ, खजिनदार बाबाजी शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका प्रीती लांडगे यांच्या यशाबद्दल धोलवड ग्रामस्थ तसेच गावातील विविध सहकारी संस्थांच्या वतीने व पुणे आणि मुंबई मित्र मंडळ परिवाराच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.